Saturday, October 27, 2018

मालवणी घावणे

मालवणी घावणे 

घावणे आमच्या मालवणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किंवा जेवताना सुद्धा खाल्ले जातात ... 
घावणे दोन प्रकारे केले जातात. रात्री तांदूळ भिजवून सकाळी वाटून त्याचे घावणे बनवायचे किंवा तांदूळ धुऊन सुकवून त्याचे पीठ बनवून केले जातात.


साहित्य 

  • १ कप तांदळाचे पीठ (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे फार बारीक दळू नये )
  • १+१/४ कप पाणी  (थोडेफार कमी - जास्त पाणी लागेल , सरसरीत असावे)
  • चवीनुसार मीठ 
  • तेल 


कृती
  •  तांदुळाचे पीठ, पाणी आणि मीठ एका वाडग्यात मिक्स करावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  • नॉन - स्टीक डोसा तवा किंवा भिडयाला नारळाच्या किशिने किंवा कांदयाने  तेल लावून घ्यावे. त्यावर तयार मिश्रण वाटीने गोल पसरवून घ्यावे.
  • झाकण ठेवून बारिक गॅसवर घावन शिजू द्यावे . २-३ मिनिटांनी घावन झाला की अजूबाजूने चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने घावन  उलटून पुन्हा १-२ मिनिटे शिजू द्यावा. 
  • गरम गरम  घावणे  नारळाच्या चटणी सोबत किंवा बटाट्याच्या पिवळ्या भाजीसोबत मस्त लागतात,






टीप 

  • जाडा तांदूळ धुऊन सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ हलके आणि पांढरे शुभ्र होतील आणि बिघडण्याची शक्यता कमी होईल .
  • घावण्यासाठी पीठ ताजेच घ्या जुन्या पिठाचे घावणे करताना तुटतात.

Thursday, June 14, 2018

मालवणी बांगड्याचे तिकले / तिखले / Fish Masala

मालवणी बांगड्याचे तिकले / तिखले / Fish Masala

माशाच्या कढी प्रमाणे जास्त पाणी न ठेवता केवळ ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे तिकले / तीखले (fish masaka / bangda masala) आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. 


साहित्य:
  • ७-८ ताजे बांगडे तुकडे करून घ्यावेत
  • ८-१० सुक्या कश्मीरी मिरच्या 
  • धने 
  • बडीशेप 
  • ४ तिरफळे
  • ४-५ कोकम 
  • कांदा
  • हळद चिमुटभर
  • १ ताजा नारळ
  • १कढीपत्ता 
  • टोमॅटो 
  • लसूण 
  • तेल फोडणीसाठी
  • मीठ चवीनुसार
कृती :
  • प्रथम कश्मीरी मिरच्या, धने व बडीशेप १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे.
  • ओळ नारळ खवून घ्यावा.
  • खववलेले खोबरे, कांदा, भिजत ठेवलेले धने, बडीशेप, मिरच्या, हळद, लसूण आणि टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत.
  • एका पातेल्यात कढीपत्त्याची फोडणी द्यावी.नंतर त्यात मिक्सर मधील वाटप टाकावेत. तिरफळे व कोकम घालावीत. चवीपुरते मीठ घालावे. कढीप्रमाणे पाणी जास्त न घालता सैल होण्यापुरते पाणी घालून जाडसरपणा टिकउन शिजू द्यावे.
  • एक उकळी आल्यावर बांगड्याचे तुकडे घालावे त्यांनतर एक उकळी आल्यावर उतरवावे.
  • बांगड्याचे तिकले गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खावे.
टीप :
हळदीचे पान असल्यास ते सुद्धा घालू शकता  हळदीच्या पानाचा सुगंध खूप सुंदर येतो.

Saturday, March 31, 2018

कैरीचे सार / कैरीची आमटी /Raw Mango Curry

कैरीचे सार / कैरीची आमटी /Raw Mango Curry 

कैऱ्यांचा मोसम चालू होत आहे.  कैरीला तिखट, मीठ लावून खाताना कसे वाटते? मस्त ना !  मग आता कैरीची हि आंबट-गोड आमटी एकदा करून बघा. नाव एकताच तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीच्या आमटीची कृती खाली देत आहे. नक्की करून बघा.

साहित्य

  • एक कैरी 
  • किसलेलं ओलं खोबरं 
  • ५-६ लसूण पाकळ्या 
  • हिरव्या मिरच्या 
  • मोहरी 
  • कढीपत्ता 
  • ५-७  काजू 
  • कोथिंबीर 
कृती 
  1. कैरीची वरची साल काढून कैरीचे मोठे मोठे तुकडे करणे.
  2. किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं, हिरव्या मिरच्या, २-३ लसूण, ५-७ काजू, कोथिंबीर आणि कैरीच्या फोडी हे सर्व एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे.
  3. गॅस वर टोप ठेऊन त्यात तेल ओतणे. तेल गरम  झाले कि मग त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकणे. मोहरी तडतडली कि मग लसूण टाकणे त्याला थोडा गुलाबी रंग आला कि मग त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकून त्यात आवश्यकतेप्रमाणे मीठ आणि पाणी घालणे आणि ढवळत राहणे.

  4. साराला उकळी आली कि मग गॅस बंद करावा.

Tuesday, March 27, 2018

फणसाच्या कुवर्याची भाजी / कोवळ्या फणसाची भाजी / Fanasachi Bhaji


फणसाच्या कुवर्याची भाजी / कोवळ्या फणसाची भाजी
Fanasachi Bhaji 



ही भाजी म्हणजे मालवणची / कोकणाची  खास देणगी आहे. याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते.  मालवणात / कोकणात  फणसाच्या कुवर्याची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते.  हि भाजी करताना फणस इतका कोवळा असावा लागतो कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत. हि भाजी  कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.


साहित्य:
  • कोवळा फणस  (फणसामध्ये गरे तयार झाले नसतील असा फणस )
  • तेल 
  • मोहरी 
  • हळद
  • ठेचलेली  लसूण 
  • लाल मसाला
  • चवीपुरते मिठ
कृती:
  1. विळीच्या पात्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे. विळीखाली वर्तमानपत्र पसरावे. फणस मधोमध आडवा चिरावा.  कागदाच्या तुकड्याने लगेच बाहेर आलेला चिक पुसावा.   






  2. प्रत्येक अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. साल काढण्यापूर्वी आतील गऱ्यांच्या वर चिवट पट्टी असते ती नीट काढून टाकावी. ही पट्टी शिजत नाही, त्यामुळे पूर्ण काढून टाकावी. सालाकडचा भाग विळीवर काढून टाकावा. सोललेला तुकडा पाण्यात बुडवून ठेवावा नाहीतर काळा पडतो. अशाप्रकारे सर्व फणस सोलून घ्यावा. 
  3. सोललेल्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करावेत. लहान कुकरमध्ये हे तुकडे टाकावेत. तुकडे बुडेल इतपत पाणी घालावे. १/२ चमचा मिठ घालावे. ३ शिट्ट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यावे.
  4. शिजवून घेतलेले फणसाचे तुकडे थोडे बारीक करून घेणे.


  5. कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, ठेचलेली लसूण, कढीपत्ता, हळद आणि लाल मसाला घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला फणस फोडणीस टाकावे. चवीपुरते मिठ घालून ५-७ मिनिटे शिजवावे.

Saturday, January 13, 2018

तिळाचे लाडू / तिळगुळाचे लाडू / Sesame Laddoo

तिळाचे लाडू / तिळगुळाचे लाडू / Sesame Laddoo

Sesame Laddoo is an Indian Sweet or Dessert that is often prepared to celebrate festivals or household events such as weddings. It is especially made during the Festival of Makar Sankranti, which falls on January 14th every year!  



साहित्य 
  • पांढरे तीळ
  • किसलेले सुखं खोबरं
  • वेलची
  • जायफळ
  • चिकीचे गूळ
  • शेंगदाणा 
  • चना डाळ 

कृती
  • पांढरे तीळ, किसलेले सुखं खोबरं आणि शेंगदाणा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणे.
  •  शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून त्याचे तुकडे करणे.
  • जायफळ आणि वेलची सुद्धा थोडी गरम करून त्याची बारीक पूड करणे. 
  • त्यानंतर मंद आचेवर टोप ठेऊन त्यात चिकीचे गूळ घालून ते वितळवून त्याचा व्यवस्थित पाक बनवावा. 
  • त्यानंतर त्यात भाजलेले पांढरे तीळ, भाजलेले सुख खोबरं, बारीक केलेले शेंगदाणे, चना डाळ, जायफळ आणि वेलचीची पूड टाकणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणे. 
  • त्यानंतर टोप खाली उतरून मिश्रण गरम गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे. 
टीप
  • गुळाचा पाक बनवताना  एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
  • तिळाच्या लाडवाचे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू बनवावेत. मिश्रण थंड झाल्यास त्याचे लाडू वळता येत नाहीत
  • लाडू बनवताना हाताला चटका बसत असल्यास हाताला थोडे पाणी लावावे.

Thursday, November 2, 2017

रवा बेसन लाडू / Rava Besan Ladoo

रवा बेसन लाडू /  Rava Besan Ladoo

This is an Indian sweet, usually prepared during Diwali in Maharashtra. Its a bit crispy because of the rava(Semolina) in it and yet binds together bcoz of the besan (gram flour). 



साहित्य

  • बारीक रवा
  • बेसन
  • तूप
  • साखर
  • वेलचीपूड
  • मनुका 
  • क्रश केलेले काजू बदाम 

कृती

  1. बारीक रवा मध्यम आचेवर थोडं तूप घालून भाजावा. ब्राऊन रंग येईपर्यंत भाजणे. तसेच भाजताना सतत पलित्याने ढवळत राहणे . (मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.) रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा.


  2. त्याच कढईत थोडे तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे.





  3. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.
  4. मनुका तुपामध्ये तळून घेणे
  5. परादीमध्ये भाजलेला रवा आणि भाजलेले बेसन मिक्स करणे त्यात आवश्यकतेएवढी बारीक केलेली साखर घालणे. वेलचीपूड, क्रश केलेले काजू बदाम आणि मनुका  घालणे. गॅसवर कढई ठेऊन त्यात थोडे तूप वितळेपर्यंत गरम करून ते त्या मिश्रणात घालणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणे. आणि त्यानंतर लाडू वळावेत.

टीप 

  • रवा आणि बेसन भाजताना मध्यम आचेवरच भाजणे.
  • लाडू वळतानाचा मिक्स पिठामध्ये तूप टाकणे.
  • लाडू वळता येतील एवढंच तूप गरम करून त्यामध्ये टाकणे.
  • हे लाडू फ्रीज मध्ये ठेऊ नयेत.
  • हवाबंद डब्यात भरून बाहेरच ठेवणे.





Thursday, October 5, 2017

मालवणी भेंडीचं सार / भेंडीचं चविष्ट कालवण / Okra Curry

मालवणी भेंडीचं सार / भेंडीचं चविष्ट कालवण / Okra Curry




साहित्य 
  • ५-६ भेंडी 
  • १ चिरलेला टोमॅटो 
  • १ चिरलेला कांदा
  • १ वाटी किसलेलं ओलं खोबरं 
  • ५-६ लसणीच्या पाकळ्या 
  • २-३ कढीपत्त्याची पाने 
  • अर्धा चमचा मोहरी 
  • ४-५  सुक्या लाल मिरच्या 
  • पाव चमचा हळद 
  • २-३ कोकम
  • चवीपुरते मीठ 


कृती 

  • ४-५ सुक्या लाल मिरच्या १ तास पाण्यात भिजत ठेवणे.

  • किसलेलं ओलं खोबरं, भिजत ठेवलेल्या सुक्या मिरच्या, त्यात जराशी हळद टाकणे, ३-४ लसणीच्या पाकळ्या टाकणे, चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो हे मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
  • भेंडी स्वच्छ धुऊन चिरून घेणे.
  • गॅस वर टोप ठेऊन थोडणीकरता त्यात थोडं तेल टाकणे. नंतर त्यात मोहरी टाकणे. मोहरी गरम झाली कि त्यात लसणीच्या ३-४ लसणीच्या पाकळ्या टाकणे आणि कढीपत्ता टाकणे. आणि नंतर त्यात चिरलेली भेंडी टाकून चमच्याने मिक्स करणे. भेंडी थोडी गरम झाली कि मग त्यात थोडं पाणी घालून चवीपुरतं मीठ टाकणे. 
  • भेंडी शिजत आली कि मग त्यात मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेले वाटण घालणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणे. 
  • २-३ कोकम टाकणे आणि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालणे.
  • भेंडीच्या आमटीला उकळी आली कि मग गॅस बंद करणे.
  • सर्व्ह करा.
टीप 
  • कोकमाऐवजी आमसूल सुद्धा घालू शकता.
  • भातासोबत हे भेंडीचं सार खूप छान लागत.






Monday, September 11, 2017

तांदळाची भाकरी / Rice Flour Roti



तांदळाची भाकरी / Rice Flour Roti 


तांदळाची भाकरी ही मालवणातील प्रसिध्द डीश आहे. ही भाकरी ओल्या नारळाची चटणी, चिकन, मटण, कुळदाच्या पिठल्या सोबत खूप छान लागते.

साहित्य
  •  तांदळाचे सुकं पिठ
  •  पाणी


कृती
  1. परादित किंवा ताटामध्ये तांदळाचे थोडे सुकं पिठ घेऊन त्यात थोडे पाणी घालून ते पिठ चांगले मळून घ्यावे


     
  2. परादित किंवा ताटामध्ये थोडे सुकं पिठ पसरवणे.
  3. तांदळाच्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवणे.

  4. परदित पसरलेल्या तांदळाच्या सुक्या पिठावर गोळा ठेवणे.


  5. आणि त्या पिठाच्या गोळ्यावर तांदळाचं सुक पिठ थोडा पसरवणे. (त्यामुळे भाकरी थापताना ती हाताला चिकटणार नाही )
  6. त्यानंतर भाकरी हलक्या हाताने हळुहळु थापणे. भाकरी पूर्ण थापून झाली की मग गॅसवर खोलगट लोखंडी तवा ठेऊन तो चांगला तापला की मग त्यावर थापलेली भाकरी तव्यावर टाकणे.

  7. वरच्या बाजूने भाकरीला थोडंसं पाणी लावणे. ते पाणी सुकत आले की मग भाकरी पलीत्याणें परतवणे.

  8. भाकरीच्या पूर्ण कडा शेकून घ्या. त्यानंतर ती भाकरी पलटी करा आणि गॅस फास्ट करा.

  9. भाकरी फुगली की ती प्लेट मध्ये काढा आणि सर्व्ह करा.



टिप
  • तांदळाच्या भाकरीचे पिठ मळताना त्यात गरम पाणी सुद्धा घालू शकता किंवा पिठ भागउन घेतले तरी चालतं. त्यामुळे भाकऱ्या सॉफ्ट होतात.
  • भाकरी हाताने थापायला जमत नसल्यास तुम्ही पोळपाटावर चपात्यानं प्रमाणे लाटू शकता.
  • पिठ मळताना त्यात शिजलेला भात आणि थोडे मिठ टाकल्याने भाकरीला छान चव येते.

Saturday, August 26, 2017

मालवणी बेसनचा पोळा

मालवणी बेसनचा पोळा / Malvani Besan Poli 



साहित्य

  • बेसन
  • लाल तिखट
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली कोथींबीर
  • हळद
  • तेल
  • चवीपुरते मीठ


कृती

  • प्रथम थोडे बेसन घेणे त्यात लाल तिखट, हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथींबीर आणि चवीपुरते मीठ घालने 
  • आणि नंतर त्यात थोडे पाणी घालून ते मिश्रण मिक्स करणे. हे मिश्रण जास्त घट्टा किवा जास्त पातळ नकोय.


  • नंतर गॅस वर पसरट तवा ठेऊन त्यात थोडे तेल घालने नंतर त्यात मिश्रण टाकून पसरवणे आणि गॅस थोडा मोठा करणे. 
  • २-३ मिनिटांनी पलीत्याने पोळा परतणे. नंतर ५ मिनिटांनी गॅस बंद करणे.


टीप

  • हा पोळा गरम गरम खायला चांगला लागतो.
  • चपाती आणि भाकरीसोबत हा पोळा खूप छान लागतो.




Sunday, August 13, 2017

मालवणी आंबोळ्या (Malvani Aambolya)

मालवणी आंबोळ्या (Malvani Aambolya)


आंबोळी हि मालवणातील खास पाककृती आहे. काही लोक घावणे आणि आंबोली एकच समजतात पण तस नाही आहे. आमच्या मालवणात तरी घावणे आणि आंबोळ्या हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. घावणे हे फक्त तांदळाच्या पिठाचे बनवले जातात . आणि आंबोळ्या ह्या पीठ आंबवून केले जातात . आंबोळी हि डोशाप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आणि आंबोळीला छान जाळी पडते.


साहित्य
  • ४ वाटी  जाडा तांदूळ
  • १ वाटी  उडीद डाळ
  • अर्धी वाटी चना डा
  • तेल
  • मीठ

कृती



  • प्रथम ४ वाटी जाडा तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी चना डाळ स्वच्छ धुऊन ७ - ८ तास भिजत ठेवणे.
  • त्यानंतर ते मिक्सरला बारीक लाऊन घेणे. त्यात चवीपुरते मीठ टाकून परत ७-८ तास ठेऊन देणे.
  • त्यानंतर भिड्याला तेल पसरून लावणे नंतर त्यात मिक्स पिठ थोड घालून ते जाडसर पसरवणे आणि झाकण ठेवणे. 


  • आणि गॅस मंद ठेवणे. आंबोळीला छोटे - छोटे होल आल्यावर ती पलित्याने परतने आणि परत झाकण ठेवणे.


  • ५ मिनिटांनी गॅस बंद करणे.

टीप
  • हि आंबोली मटण रस्सा, कोंबडी रस्सा, काळे वाटाणे आमटी किंवा चना आमटी सोबत छान लागते .
  • नारळाच्या चटणीसोबत सुद्धा छान लागते. 
  • आंबोळ्या तुम्ही non stick pan मध्ये सुद्धा करू शकतात.


शेवग्याच्या पानाची भाजी / शेगलाची भाजी


शेवग्याच्या पानाची भाजी / शेगलाची भाजी





शेवग्याच्या शेंगांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये व्हिटामिन ए, बी-१, सी, कॅल्शियम व लोह याचा साठा असतो. पण शेवग्याच्या पानांमध्येही व्हिटामिन ए, बी-१, सी, फॉस्फरस, काबरेहायड्रेट, लोह व प्राथिने यांचा भरपूर साठा असतो व याची भाजी पण चवदार होते. कोकणात गोकुळाष्टमीच्या उपवासाला हि भाजी आणि आंबोळ्या करतात.

साहित्य :
  • शेवग्याचा पाला
  •  २ मोठे कांदे
  • हिरव्या मिरच्या
  • किसलेलं ओलं खोबरं
  • नारियल तेल
  • चवीपुरते मीठ
कृती

  • शेवग्याचा पाला काढून तो धुवून घ्यावा .
  • नंतर तो पाला चाळणीमध्ये १०-१५ मिनिटे ठेऊन द्यावा त्यामुळे त्यातील पाणी निथळून गेल्यावर पाने बारीक चिरून घेणे. 
  • २ मोठे कांदे बारीक चिरून टाकणे आणि हिरवी मिरची चिरून टाकणे.
  • नंतर हे मिश्रण कढईत काढून मंद आचेवर गॅस वर ठेवावी 
  • कढईवर झाकण ठेवावे.
  • २-३ मिनिटांनी ती भाजी परतावी आणि चवीपुरते मीठ टाकावे.
  • भाजीतले पाणी पूर्ण सुकले कि त्यात ओलं खोबरं घालणे आणि वरून नारियल तेल थोडं टाकून भाजी परतून घ्यावी आणि झाकण ठेऊन २-३ मिनिटांनी गॅस बंद करावा.
टीप :
  • इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.
  • शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.
  • ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.