Saturday, October 27, 2018

मालवणी घावणे

मालवणी घावणे 

घावणे आमच्या मालवणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किंवा जेवताना सुद्धा खाल्ले जातात ... 
घावणे दोन प्रकारे केले जातात. रात्री तांदूळ भिजवून सकाळी वाटून त्याचे घावणे बनवायचे किंवा तांदूळ धुऊन सुकवून त्याचे पीठ बनवून केले जातात.


साहित्य 

  • १ कप तांदळाचे पीठ (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे फार बारीक दळू नये )
  • १+१/४ कप पाणी  (थोडेफार कमी - जास्त पाणी लागेल , सरसरीत असावे)
  • चवीनुसार मीठ 
  • तेल 


कृती
  •  तांदुळाचे पीठ, पाणी आणि मीठ एका वाडग्यात मिक्स करावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  • नॉन - स्टीक डोसा तवा किंवा भिडयाला नारळाच्या किशिने किंवा कांदयाने  तेल लावून घ्यावे. त्यावर तयार मिश्रण वाटीने गोल पसरवून घ्यावे.
  • झाकण ठेवून बारिक गॅसवर घावन शिजू द्यावे . २-३ मिनिटांनी घावन झाला की अजूबाजूने चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने घावन  उलटून पुन्हा १-२ मिनिटे शिजू द्यावा. 
  • गरम गरम  घावणे  नारळाच्या चटणी सोबत किंवा बटाट्याच्या पिवळ्या भाजीसोबत मस्त लागतात,






टीप 

  • जाडा तांदूळ धुऊन सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ हलके आणि पांढरे शुभ्र होतील आणि बिघडण्याची शक्यता कमी होईल .
  • घावण्यासाठी पीठ ताजेच घ्या जुन्या पिठाचे घावणे करताना तुटतात.

Thursday, June 14, 2018

मालवणी बांगड्याचे तिकले / तिखले / Fish Masala

मालवणी बांगड्याचे तिकले / तिखले / Fish Masala

माशाच्या कढी प्रमाणे जास्त पाणी न ठेवता केवळ ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे तिकले / तीखले (fish masaka / bangda masala) आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. 


साहित्य:
  • ७-८ ताजे बांगडे तुकडे करून घ्यावेत
  • ८-१० सुक्या कश्मीरी मिरच्या 
  • धने 
  • बडीशेप 
  • ४ तिरफळे
  • ४-५ कोकम 
  • कांदा
  • हळद चिमुटभर
  • १ ताजा नारळ
  • १कढीपत्ता 
  • टोमॅटो 
  • लसूण 
  • तेल फोडणीसाठी
  • मीठ चवीनुसार
कृती :
  • प्रथम कश्मीरी मिरच्या, धने व बडीशेप १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे.
  • ओळ नारळ खवून घ्यावा.
  • खववलेले खोबरे, कांदा, भिजत ठेवलेले धने, बडीशेप, मिरच्या, हळद, लसूण आणि टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत.
  • एका पातेल्यात कढीपत्त्याची फोडणी द्यावी.नंतर त्यात मिक्सर मधील वाटप टाकावेत. तिरफळे व कोकम घालावीत. चवीपुरते मीठ घालावे. कढीप्रमाणे पाणी जास्त न घालता सैल होण्यापुरते पाणी घालून जाडसरपणा टिकउन शिजू द्यावे.
  • एक उकळी आल्यावर बांगड्याचे तुकडे घालावे त्यांनतर एक उकळी आल्यावर उतरवावे.
  • बांगड्याचे तिकले गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खावे.
टीप :
हळदीचे पान असल्यास ते सुद्धा घालू शकता  हळदीच्या पानाचा सुगंध खूप सुंदर येतो.

Saturday, March 31, 2018

कैरीचे सार / कैरीची आमटी /Raw Mango Curry

कैरीचे सार / कैरीची आमटी /Raw Mango Curry 

कैऱ्यांचा मोसम चालू होत आहे.  कैरीला तिखट, मीठ लावून खाताना कसे वाटते? मस्त ना !  मग आता कैरीची हि आंबट-गोड आमटी एकदा करून बघा. नाव एकताच तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीच्या आमटीची कृती खाली देत आहे. नक्की करून बघा.

साहित्य

  • एक कैरी 
  • किसलेलं ओलं खोबरं 
  • ५-६ लसूण पाकळ्या 
  • हिरव्या मिरच्या 
  • मोहरी 
  • कढीपत्ता 
  • ५-७  काजू 
  • कोथिंबीर 
कृती 
  1. कैरीची वरची साल काढून कैरीचे मोठे मोठे तुकडे करणे.
  2. किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं, हिरव्या मिरच्या, २-३ लसूण, ५-७ काजू, कोथिंबीर आणि कैरीच्या फोडी हे सर्व एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे.
  3. गॅस वर टोप ठेऊन त्यात तेल ओतणे. तेल गरम  झाले कि मग त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकणे. मोहरी तडतडली कि मग लसूण टाकणे त्याला थोडा गुलाबी रंग आला कि मग त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकून त्यात आवश्यकतेप्रमाणे मीठ आणि पाणी घालणे आणि ढवळत राहणे.

  4. साराला उकळी आली कि मग गॅस बंद करावा.

Tuesday, March 27, 2018

फणसाच्या कुवर्याची भाजी / कोवळ्या फणसाची भाजी / Fanasachi Bhaji


फणसाच्या कुवर्याची भाजी / कोवळ्या फणसाची भाजी
Fanasachi Bhaji 



ही भाजी म्हणजे मालवणची / कोकणाची  खास देणगी आहे. याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते.  मालवणात / कोकणात  फणसाच्या कुवर्याची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते.  हि भाजी करताना फणस इतका कोवळा असावा लागतो कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत. हि भाजी  कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.


साहित्य:
  • कोवळा फणस  (फणसामध्ये गरे तयार झाले नसतील असा फणस )
  • तेल 
  • मोहरी 
  • हळद
  • ठेचलेली  लसूण 
  • लाल मसाला
  • चवीपुरते मिठ
कृती:
  1. विळीच्या पात्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे. विळीखाली वर्तमानपत्र पसरावे. फणस मधोमध आडवा चिरावा.  कागदाच्या तुकड्याने लगेच बाहेर आलेला चिक पुसावा.   






  2. प्रत्येक अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. साल काढण्यापूर्वी आतील गऱ्यांच्या वर चिवट पट्टी असते ती नीट काढून टाकावी. ही पट्टी शिजत नाही, त्यामुळे पूर्ण काढून टाकावी. सालाकडचा भाग विळीवर काढून टाकावा. सोललेला तुकडा पाण्यात बुडवून ठेवावा नाहीतर काळा पडतो. अशाप्रकारे सर्व फणस सोलून घ्यावा. 
  3. सोललेल्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करावेत. लहान कुकरमध्ये हे तुकडे टाकावेत. तुकडे बुडेल इतपत पाणी घालावे. १/२ चमचा मिठ घालावे. ३ शिट्ट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यावे.
  4. शिजवून घेतलेले फणसाचे तुकडे थोडे बारीक करून घेणे.


  5. कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, ठेचलेली लसूण, कढीपत्ता, हळद आणि लाल मसाला घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला फणस फोडणीस टाकावे. चवीपुरते मिठ घालून ५-७ मिनिटे शिजवावे.

Saturday, January 13, 2018

तिळाचे लाडू / तिळगुळाचे लाडू / Sesame Laddoo

तिळाचे लाडू / तिळगुळाचे लाडू / Sesame Laddoo

Sesame Laddoo is an Indian Sweet or Dessert that is often prepared to celebrate festivals or household events such as weddings. It is especially made during the Festival of Makar Sankranti, which falls on January 14th every year!  



साहित्य 
  • पांढरे तीळ
  • किसलेले सुखं खोबरं
  • वेलची
  • जायफळ
  • चिकीचे गूळ
  • शेंगदाणा 
  • चना डाळ 

कृती
  • पांढरे तीळ, किसलेले सुखं खोबरं आणि शेंगदाणा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणे.
  •  शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून त्याचे तुकडे करणे.
  • जायफळ आणि वेलची सुद्धा थोडी गरम करून त्याची बारीक पूड करणे. 
  • त्यानंतर मंद आचेवर टोप ठेऊन त्यात चिकीचे गूळ घालून ते वितळवून त्याचा व्यवस्थित पाक बनवावा. 
  • त्यानंतर त्यात भाजलेले पांढरे तीळ, भाजलेले सुख खोबरं, बारीक केलेले शेंगदाणे, चना डाळ, जायफळ आणि वेलचीची पूड टाकणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणे. 
  • त्यानंतर टोप खाली उतरून मिश्रण गरम गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे. 
टीप
  • गुळाचा पाक बनवताना  एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
  • तिळाच्या लाडवाचे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू बनवावेत. मिश्रण थंड झाल्यास त्याचे लाडू वळता येत नाहीत
  • लाडू बनवताना हाताला चटका बसत असल्यास हाताला थोडे पाणी लावावे.