फणसाच्या कुवर्याची भाजी / कोवळ्या फणसाची भाजी
Fanasachi Bhaji
Fanasachi Bhaji
ही भाजी म्हणजे मालवणची / कोकणाची खास देणगी आहे. याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते. मालवणात / कोकणात फणसाच्या कुवर्याची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते. हि भाजी करताना फणस इतका कोवळा असावा लागतो कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत. हि भाजी कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.
साहित्य:
- कोवळा फणस (फणसामध्ये गरे तयार झाले नसतील असा फणस )
- तेल
- मोहरी
- हळद
- ठेचलेली लसूण
- लाल मसाला
- चवीपुरते मिठ
कृती:
- विळीच्या पात्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे. विळीखाली वर्तमानपत्र पसरावे. फणस मधोमध आडवा चिरावा. कागदाच्या तुकड्याने लगेच बाहेर आलेला चिक पुसावा.
- प्रत्येक अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. साल काढण्यापूर्वी आतील गऱ्यांच्या वर चिवट पट्टी असते ती नीट काढून टाकावी. ही पट्टी शिजत नाही, त्यामुळे पूर्ण काढून टाकावी. सालाकडचा भाग विळीवर काढून टाकावा. सोललेला तुकडा पाण्यात बुडवून ठेवावा नाहीतर काळा पडतो. अशाप्रकारे सर्व फणस सोलून घ्यावा.
- सोललेल्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करावेत. लहान कुकरमध्ये हे तुकडे टाकावेत. तुकडे बुडेल इतपत पाणी घालावे. १/२ चमचा मिठ घालावे. ३ शिट्ट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यावे.
- शिजवून घेतलेले फणसाचे तुकडे थोडे बारीक करून घेणे.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, ठेचलेली लसूण, कढीपत्ता, हळद आणि लाल मसाला घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला फणस फोडणीस टाकावे. चवीपुरते मिठ घालून ५-७ मिनिटे शिजवावे.






मस्तच😋
ReplyDelete